संभाजीनगर-दौलताबाद रेल्वे दुपदरीकरणाला संथगतीचा ब्रेक

Foto


९० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचा वेग आणि फेऱ्या वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या छत्रपती संभाजीनगर-अंकाई रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाला अद्याप अपेक्षित गती मिळालेली नाही. विशेषतः छत्रपती संभाजीनगर ते दौलताबाददरम्यानचे काम संथगतीने सुरू असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, लासूर ते पोटूळदरम्यान दुपदरीकरणाचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे. त्यामुळे संपूर्ण मार्गाच्या कामाला समान गती देण्याची मागणी रेल्वे प्रवाशांकडून होत आहे.
छत्रपती संभाजीनगर-अंकाईदरम्यानच्या सुमारे ९० किलोमीटरच्या मार्गाचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. या प्रकल्पाचे काम अंकाई करंजगाव आणि
करंजगाव-छत्रपती संभाजीनगर अशा दोन टप्प्यांत केले जात आहे. नगरसोल तारूर-रोटेगाव तसेच लासूर-पोटूल दौलताबाददरम्यान विविध ठिकाणी काम सुरू आहे. यापैकी लासूर-पोटूल मार्गावरील कामाला चांगली गती मिळाली असून, सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणासाठी दीर्घ प्रतीक्षेनंतर २०२१ मध्ये सर्वेक्षणाला मंजुरी मिळाली. त्यानंतर प्रकल्पाला मंजुरी देऊन निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि नोव्हेंबर २०२४ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. संपूर्ण प्रकल्प जून २०२७ पर्यंत पूर्ण
करण्याचे लक्ष्य रेल्वे प्रशासनाने ठेवले आहे. सध्या या प्रकल्पाचे सुमारे ६० टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर-दौलताबाददरम्यानच्या कामाला प्राधान्याने गती देण्याची गरज आहे, अशी मागणी रेल्वे प्रवासी सेनेचे राजकुमार सोमाणी यांनी केली. मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा मार्ग महत्त्वाचा असून, दुपदरीकरण पूर्ण झाल्यानंतर रेल्वे वाहतुकीची क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे निर्धारित मुदतीत काम पूर्ण करण्यासाठी संथगतीने सुरू असलेल्या भागातील कामाला वेग देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions